Tuesday, 27 September 2016

श्री विठ्ठलाच्या शरीरावरील खुणा आणि त्याचे विश्लेषण

विठोबाची महापूजा बघतांना मला त्याच्या अंगावर असलेल्या खुणा प्रत्यक्ष बघायच्या होत्या; परंतु विठोबाची मूर्ती माझ्यापासून ६-७ फुटांवर असल्याने त्या मला दिसत नव्हत्या. तेव्हा मी देवाला मनात म्हटले, `तुझ्या अंगावरच्या खुणा मला कशा काय दिसणार ?’ त्या वेळी `तू त्या सूक्ष्मातून बघ’, असे आतून उत्तर आले. त्यानंतर मी विठोबाच्या मूर्तीवर मन एकाग्र करू लागले. मूर्तीजवळ जातांना खूप आनंद होत होता. ज्या वेळी मी आणखी खोल जाऊ लागले, त्या वेळी मन एकदम शांत झाले. (सूक्ष्म-चित्राचे आकृतीतील क्रमांक कंसामध्ये घातले आहेत.)

१. विठोबाच्या अनाहतचक्राशी मोठे निळे विष्णूपद जाणवले. (५)

२. छातीवर भृगू ऋषींनी मारलेल्या लाथेचा अंगठा रुतल्याचे चिन्ह आहे. त्या चिन्हाभोवती पिवळे प्रकाशवलय जाणवले. (४)

३. गळयात कंठाशी असलेला कौत्सुभमणी लाल प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. (३)

४. डोक्यावर असलेल्या शिवपिंडीभोवती पांढरा प्रकाश होता. (१)

५. मकराकार कुंडले पिवळया रंगाच्या प्रकाशाची होती.

६. कटीवर ठेवलेल्या एका हातात असलेला शंख निळा, तर दुसर्‍या हातातील कमळ लालसर रंगाचे जाणवले.

७. रखुमाईला बसण्यासाठी असलेल्या चंद्राकृती जागेत लाल रंगाचे शक्‍तीतत्त्व जाणवले.

८. कमरेला असणारा वासुकीच्या दोर्‍याचा विळखा संपूर्णत: पिवळया प्रकाशाचा होता व त्यातून अनेक चैतन्यलहरी वायूमंडलात प्रक्षेपित होत होत्या. (७)

९. नाभीमध्ये सरस्वतीतत्त्वाचा वास जाणवून तेथे पांढरे कमळ जाणवले. (६)

१०. आज्ञाचक्रातून विजेरीसारखा निळा झोत सगळीकडे फिरत होता. (२)

११. दोन पायांच्या मधे असलेल्या काठीमध्ये कृष्णतत्त्व जाणवून त्या काठीतून प्रक्षेपित होणार्‍या लाल रंगाच्या मारक लहरी पाताळापर्यंत जात असल्याचे व विठोबा एकाच वेळी ऊर्ध्व लोक व अधो लोक यांवर नियंत्रण ठेवत असल्याचे जाणवले. (८)

१२. विठोबाच्या उजव्या पावलावर मुक्‍तकेशी दासीच्या हातांची बोटे रुतलेला ठसा आहे. मुक्‍तकेशी दासीला तिच्या रूपाचा खूप गर्व होता. तिचे गर्वहरण करण्यासाठी पांडुरंगाने अतिशय सुकुमार रूप धारण केले व ते एवढे कोमल होते की, मुक्‍तकेशी त्याच्या पायाला हात लावून दर्शन घेतांना तिच्या हातांची बोटे पांडुरंगाच्या पावलात रुतली. त्या ठशात लालसर शक्‍तीप्रवाहाचा बिंदू जाणवला.

१३. विठोबाच्या पायाखाली पुंडलिकाने पांडुरंगाला उभे रहाण्यासाठी फेकलेली वीट आहे. त्या विटेतून दाही दिशांना चैतन्याचे अनेक प्रवाह प्रक्षेपित होतांना जाणवले. विटेकडे पाहून आपोआपच देवाच्या चरणी लीन व्हायला झाले. (९) 

- गुरु बोध

No comments:

Post a Comment