Monday, 5 September 2016

सुखकर्ता दुःखहर्ता -गणपति आरती आणि अर्थ

🚩सुखकर्ता दु:खहर्ता 🚩

🚩आरती हा भक्तहृदयाचा प्रसन्न अाविष्कार आहे. आपल्या आराध्याची परम प्रेमादराने गायलेली स्तुती म्हणजे आरती. 'रती' म्हणजे तीव्र प्रेम, भक्ताच्या हृदयातील तीव्र प्रेम ज्या प्रक्रियेने तो आपल्या देवतेला अर्पण करतो त्याला आरती म्हणतात.🙏🏻🚩

🚩आपल्याकडील भक्तिउपचारांमध्ये म्हणूनच आरतीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे.🙏🏻🚩

गणपती ही सर्वादिपूज्य देवता  आहे. त्यामुळे आरतीही त्यांचीच प्रथम म्हटली जाते.🙏🏻🚩

मराठी संतकवींमध्ये समर्थ श्रीरामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याच सर्वात जास्त प्रचलित आहेत. आपल्या अंगभूत रसाळता, मार्मिकता आणि गेयता इत्यादी गुणांमुळेच श्रीसमर्थांच्या आरत्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी रचलेली 🙏🏻

🚩' सुखकर्ता दुःखहर्ता .....' ही सर्व मराठी लोकांच्या नित्यपठणात असणारी गणपतीची आरती अतीव सुंदर आहे. रोज म्हणत असलेल्या आरतीचा अर्थ नीट समजला तर म्हणताना अधिक आनंद लाभतो; म्हणूनच हा लेखनप्रपंच.🙏🏻🚩

🚩ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या भगवान श्रीगणेशांच्या सुरेख स्वरूपाचे चपखल वर्णन करताना श्रीसमर्थ म्हणतात,

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रें मनःकामना पुरती ॥ध्रु.॥🙏🏻🚩

🚩भगवान गणेश सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत. आपल्या भक्तांची सर्व प्रकारची दुःखे ते कृपाकटाक्षाने दूर करतात आणि शाश्वत सुख त्याच्या आयुष्यात निर्माण करतात. ज्यांची प्रेमकृपा दुःखांची वार्ताही नि:शेष नष्ट करते, त्या भगवान श्रीगणपतींनी सर्वांगी भक्तवात्सल्याच्या शेंदराची उटी चर्चिलेली असून भक्तप्रेमरूपी मोत्यांची तेजस्वी माळ गळ्यात घातलेली आहे. अशा मंगलमूर्ती देवाधिदेव श्रीविघ्नहर गणपतींचा जयजयकार असो ! त्यांच्या नुसत्या दर्शनानेही भक्तांच्या अखिल मनोकामना पूर्ण होतात.🙏🏻🚩

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरें चरणीं घागरिया ॥२॥🙏🏻🚩

🚩अनर्घ्य रत्नांनी जडवलेले सुंदर पदक गौरीकुमरा तुला शोभा देत आहे. केशरयुक्त लालसर सुगंधी चंदनउटी तुझ्या सर्वांगी मोहक दिसत आहे. तुझ्या मस्तकावरचा हिरेजडित मुकुट तेजाने तळपत असून पायातील घागऱ्या, पैंजण मधुर ध्वनी करीत भक्तांच्या हृदयात आल्हाद निर्माण करीत आहेत. तुझे हे मनोहर रूप तुझ्या भक्तांना अंतर्बाह्य वेध लावून कमळकोशात गुंगलेल्या भुंग्याप्रमाणे खिळवून ठेवत आहे.🙏🏻🚩

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळसोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकष्टीं पावावें निर्वाणीं रक्षावे सुरवरवंदना ॥३॥

🚩हे पीतांबर नेसलेल्या लंबोदरा, कंबरेला नागाचे बंधन धारण करणाऱ्या, सरळ सोंड व वाकड्या मुखाच्या गणराया, तीन नेत्र असलेल्या श्रीगजानना, हा रामाचा दास तुझी आपल्या घरी आतुरतेने वाट पाहात आहे. तू त्याच्या प्रेमप्रार्थनेचा स्वीकार करून त्याच्या शुद्ध अंत:करणरूपी घरी लवकर प्रकट हो आणि त्याचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करून त्याचा आणि त्याचा रामभक्तीचा शेवटपर्यंत सांभाळ कर. 🙏🏻🚩

श्रेष्ठ देवताही ज्याला वंदन करतात अशा श्रीगणेशा, या रामदासाची प्रेमार्ती स्वीकारून तू भरभरून कृपा कर !
समर्थ संप्रदायात यातील पहिले आणि तिसरे अशी दोनच कडवी म्हटली जातात. 'रत्नखचित फरा.... ' हे कडवे म्हणत नाहीत.

काही अभ्यासकांचा शेवटच्या चरणातील ' संकष्टी का संकटी ' यावर मतभेद आहे. पण दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. संकष्टी पावावें म्हणजे संकटांमध्ये पावावे. संकष्टी चतुर्थीचा याच्याशी काहीही संबंध नाही. जुन्या काळातील मराठीत संकष्ट असाही शब्दप्रयोग होता. त्यामुळे संकटी पावावे आणि संकष्टी पावावे हे दोन्ही पाठ अर्थदृष्टया बरोबरच आहेत. संकष्ट म्हणजे तीव्र कष्ट, मोठी दु:खे. अशा संकटांच्या वेळी विघ्नहर्ताच स्वाभाविकपणे आठवणार ना !🚩🙏🏻

काही लोक ' दर्शनमात्रे मन स्मरणेमात्रे मन:कामना पुरती ' असे म्हणतात. ते मात्र पूर्ण चूक आहे. कोणाच्याही मूळ रचनेत पदरचे शब्द घालणे, हे साधुसंतांनी चुकीचे म्हणूनच सांगितलेले आहे. त्यामुळे मूळची आरती जशी आहे तशीच, शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार करीत म्हणायला हवी; स्वतःचे कोणतेही शब्द त्यात न घालता. संतांच्या शब्दांना जसे सामर्थ्य असते तसे आपल्या शब्दांना नक्कीच नसते; म्हणून संतांच्या वाङ्मयात जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने होणारी ही पदरची भर आपण सर्वांनी कायमच टाळली पाहिजे.🙏🏻

🚩 काही लोक समर्थांच्या या आरतीत सात कडवी आहेत, असेही म्हणतात व ती कडवी असलेल्या पोस्ट भरपूर फिरतही आहेत, पण त्या कडव्यांबाबत साशंकता आहे. ती प्रक्षिप्त असून नंतरच्या कोणा कवींनी रचून आरतीत घातली असावीत, ह्या म्हणण्यालाच अभ्यासक जास्त मान्यता देताना दिसतात.
प्रेमाने केलेली आरती, ही स्तुतिप्रिय अशा श्रीभगवंतांना आपल्याविषयी करुणा उत्पन्न होण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणूनच, घाईगडबड न करता, प्रसादाकडे सारखे लक्ष न देता, प्रेमाने आणि मनापासून, आरतीतील शब्दांचा सुयोग्य अर्थ जाणून, त्यातील भावना आपल्या अंतःकरणात रुजवून आरती म्हटली पाहिजे. जर आपण फक्त गणेशोत्सवातच नाही तर रोजच्या पूजेतही अशाच प्रकारे आरती म्हटली, तर त्यातून अधिक आनंद लाभेलच; शिवाय भक्तांवर निरतिशय प्रेम करणारे भगवान श्रीगणेश देखील प्रसन्न होऊन आपल्या सर्व दुःखांचा समूळ नाश करून आपले आयुष्य सुखसमाधानाने भरून टाकतील यात तिळमात्र शंका नाही ! 🙏🏻🚩

म्हणूनच या छोट्या लेखातून आपल्याला आवडणा-या आरतीवर श्रीगुरुकृपेने लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा लेख आपल्या अनेकानेक सुहृदांपर्यंत पोहोचवून आपणही सर्वांनी आमच्यासोबत श्रीगणेश गुणवर्णनरूप सेवा साधावी, ही विनंती. 🙏🏻🚩
आजपासून दहा दिवस चालणा-या आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीगणेशोत्सवात सर्वांकडून भगवान श्रीगणरायांची प्रेमाने व श्रद्धेने भरपूर उपासना होवो व सर्वांच्या हृदयात, बुद्धीत ते ज्ञाननिधी भगवान श्रीगणेश सद्बुद्धीचा प्रकाश करोत, हीच श्रीगुरुचरणीं सादर प्रार्थना !!

देवा तूंचि गणेश ।
सकलार्थमतिप्रकाश ।
म्हणे निवृत्तिदास ।
अवधारिजो जी ॥ज्ञाने.१.०.२॥
विश्वविकासित मुद्रा ।
जया सोडवी तुझी योगनिद्रा ।
तयां नमो श्रीगणेंद्रा ।
श्रीगुरुराया ॥ज्ञाने.१७.०.१॥

मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया !!!🚩

🙏🏻 ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ  💐

No comments:

Post a Comment