*अय मुख्यमंत्र्या...*
अय मुख्यमंत्र्या, तुला मायबाप सरकार म्हणत्यात ना?
चल, आधी तु हमी दे माझ्या
शेतमालाला किमान भाव देण्याची
मग मी तुला हमी देतो माझी
आत्महत्या न करण्याची...
अय मुख्यमंत्र्या, ह्या राज्यात तुच सगळं ठरवतोस ना?
चल, आधी तु हमी दे पीक कापणीला
आल्यावर निर्यातबंदी न करण्याची;
मग मी तुला हमी देतो माझी
आत्महत्या न करण्याची...
अय मुख्यमंत्र्या, शिटीतल्या कंपन्यांना चोवीस तास
पाणी, लाईट तुच देतोस ना?
चल, आधी तु हमी दे ऐन उन्हाळ्यात
पीकं जळत असताना आमची लाईट न तोडायची
मग मी तुला हमी देतो माझी
आत्महत्या न करण्याची...
अय मुख्यमंत्र्या, गारपीट झाल्यावर दोनशे रुपये
एकरी नुकसानभरपाई तुच देतोस ना?
चल, आधी तु हमी दे तुझा सरकारी
हवामान अंदाज खरा ठरण्याची
मग मी तुला हमी देतो माझी
आत्महत्या न करण्याची...
अय मुख्यमंत्र्या, तननाशकाच्या बाटलीवर
पायलीचे पन्नास टॅक्स तुच लावतोस ना?
चल, आधी तु हमी दे त्या चार बाटल्या
मारल्यावर तरी गवात आळ्या मरायची
मग मी तुला हमी देतो माझी
आत्महत्या न करण्याची...
अय मुख्यमंत्र्या, लाखो रुपये मोलाच्या जमिनीवर
पन्नास हजार रुपडे पीककर्ज तुच देतोस ना?
चल, आधी तु हमी दे पन्नास हजारात
एका एकराची लागवड करायची
मग मी तुला हमी देतो माझी
आत्महत्या न करण्याची...
अय मुख्यमंत्र्या, मोठ्यामोठ्या इंग्लिश मिडीयमच्या
शाळा तुझ्याच हाताखाली चालतात ना?
चल, आधी तु हमी दे आमच्या बी पोरांना
तसलंच शिक्षाण सरकारी शाळेत द्यायची
मग मी तुला हमी देतो माझी
आत्महत्या न करण्याची...
अय बिल्डरांच्या मुख्यमंत्र्या,
अन् नोटवाल्यांच्या मुख्यमंत्र्या,
नी वोटवाल्यांच्या मुख्यमंत्र्या...
अय एसीत बसून ब्रेड बटर खाणा-या सरकारच्या मुख्यमंत्र्या,
चल, आधी तु हमी दे बळीराजाची करपी भाकर
पचवून आमचा बी मुख्यमंत्री होण्याची
मग मी तुला हमी देतो माझी
आत्महत्या न करण्याची...
_किसानपुत्र...
No comments:
Post a Comment