आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
भक्त संकटी नाना स्वरुपी स्थापिसि स्वधर्म ll
अंबऋषी कारणे गर्भवास सोशीसी
वेद नेले चोरुनी ब्रह्म्या आनूनिया देसी
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडिसी
हस्त तुझा लागता शंखासुरा वर देसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ll
रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेशी
परोपकारासाठी देवा कासव झालासी
दाढे धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी
प्रल्हादाकारणे स्तम्भी नरहरी गुरगुरसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ll
पाचवे अवतारी बळीच्या द्वाराला जासी
भिक्षेस्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी
सर्व समर्पण केले म्हणुनी प्रसन्न त्या होसी
वामनरुप धरुनी बळीच्या द्वारी तिष्ठसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ll
सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला
निक्षत्री पृथ्वी दाने दीधली विप्राला
सहावा अवतार परशुराम प्रकटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ll
मातला रावण सर्वां उपद्रव केला
तेहतीस कोटी देव बंदी हरिले सीतेला
पितृवचनालागी रामे वनवास केला
मिळोनी वानर सहित राजाराम प्रकटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ll
देवकी वसुदेव बन्दीमोचन त्वां केले
नंदा घरी जाऊन निजसुख गोकुळा दिधले
गोरस चोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळवले
गोपिकांचे प्रेम देखुनी श्रीकृष्ण भुलले
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ll
बौद्ध कलंकी कलियूगी झाला अधर्म हा अवघा
सोडूनी दिधला धर्म म्हणुनी ना दिसशी देवा
म्लेंच्छांमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाचि सेवा
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ll
No comments:
Post a Comment